एलसीबीची गुटखा माफियांवर सर्वात माेठी कारवाई; मेहकर हद्दीत तब्बल १.१३ कोटींचा गुटखा जप्त; तीन आराेपींना अटक; समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईकडे नेण्यात येत हाेता गुटखा ...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा माफियांविरुद्ध सर्वात माेठी कारवाई करीत तब्बल एक काेटी ४३ लाख रुपयांचा एवज जप्त केला आहे. समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईकडे दाेन ट्रकमधून गुटखा नेण्यात येत असताना ३० सप्टेंबर राेजी मेहकर हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पाेलिसांनी १.१३ काेटींच्या गुटख्यासह दाेन ट्रक जप्त केले आहे. दाेन्ही ट्रकच्या चालकासह एलसीबीने तिघांना अटक केली आहे.  

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी विशेष पथक तयार केले. ३० सप्टेंबर रोजी पथकाला माहिती मिळाली की, अमरावती येथून समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईकडे दोन ट्रकने गुटखा व पान मसाल्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे.
त्यावर मेहकर पोलीस ठाणे हद्दीत फर्दापूर टोलनाका येथे सापळा रचून दोन अशोक लेलँड ट्रक पकडण्यात आले. तपासणीदरम्यान ट्रकमधून गुटखा भरलेली २६४ पोती (किंमत ₹१,१३,०९,७६०/-) तसेच दोन ट्रक (किंमत ₹३०,००,०००/-) असा एकूण ₹१,४३,०९,७६०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी पाेलिसांनी मोहम्मद इम्रान मोह. हफिज (२८), रा. बियाबानी मोहल्ला, अचलपूर, जि. अमरावती, अजीम बेग हाफिज बेग (३६), रा. अन्सारनगर, अमरावती, एजाज अहमद अजीज अहमद (३१), रा. शिरजगाव, ता. चांदूरबाजार, जि. अमरावती यांना अटक केली आहे. आराेपीविरुद्ध  मेहकर पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम २७४, २७५, २३३, १२३ तसेच अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम २६, २७, ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


ही कारवाई जिल्हा पाेलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशाने  अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पो.उप.नि. प्रताप बाजड, अविनाश जायभाये, पोहेकॉ. शरद गिरी, दीपक लेकुरवाळे, पुरुषोत्तम आघाव, गणेश पाटील, पोकॉ. निलेश राजपूत, मपो.काॅ. पूजा जाधव, चालक पोहेकॉ. समाधान टेकाळे (स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा) तसेच पोहेकॉ. राजू आडवे, पोकॉ. ऋषीकेश खंडेराव (तांत्रिक विश्लेषण विभाग, बुलढाणा) यांनी केली.