मोताळ्यात LCB चा छापा; १ किलो १७० ग्रॅम गांजासह १९ वर्षीय तरुण पोलिसांच्या ताब्यात..

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मोताळा शहरातील पाचपीर दर्गा परिसरात गांजाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. रविवार, ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल १ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एका १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोताळा शहरातील पाचपीर दर्गा परिसरात गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी रात्री परिसरात सापळा रचून अचानक कारवाई केली. यावेळी शेख साहिल शेख रफिक (वय १९, रा. पाचपीर दर्गाजवळ, मोताळा) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो १७० ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ५० हजार रुपये प्रति किलो या दराने एकूण ५८ हजार ५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात शेख साहिल शेख रफिक याच्याविरुद्ध अप. क्र. ४३४/२०२६, कलम ८(क), २०(ब)(ii)(२) एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.