एलसीबीच्या ५ विकेट पडल्या! कर्णधार अंबुलकरांसह पाच जणांची नियंत्रण कक्षात बदली! जळगाव जामोद चे ठाणेदारही बदलले... धडावेगळे शीर मर्डर प्रकरण तापले..!
Updated: May 30, 2026, 14:08 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोदच्या बहुचर्चित "धडा वेगळे शिर" मर्डर प्रकरणात धक्कादायक खुलासा झाल्यानंतर त्याचे प्रतिसाद आता जिल्हा पोलीस दलात उमटू लागले आहेत. जिच्या खुनाच्या प्रकरणात वडील आणि भावाला अटक केली ती शिवानी जिवंत निघाल्यानंतर जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. तपासानंतर पाठ थापटून घेणाऱ्या एलसीबीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या गंभीर प्रकरणानंतर कर्तव्यदक्ष एसपी निलेश तांबे यांनी तातडीने कारवाई केली आहे. या प्रकरणातील संपूर्ण तपास पथक , एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशन चे ठाणेदार नितीन पाटील अशा सहा जणांच्या नियंत्रण कक्षात बदल्या करण्यात आल्या आहेत.
राजुरा शिवारात २६ एप्रिल रोजी शिर नसलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातील खकनार पोलीस ठाणे हद्दीतील शिवानी कलमेकर ही महिला बेपत्ता असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर राजुरा येथे सापडलेला मृतदेह शिवानीचाच असल्याचा निष्कर्ष काढत पोलिसांनी तिचे वडील आणि भाऊ यांना खून प्रकरणात अटक केली होती.
मात्र, 28 मे रोजी या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. मृत समजली गेलेली शिवानी कलमेकर स्वतः खकनार पोलीस ठाण्यात हजर झाली. “मी जिवंत असून माझ्या खुनाच्या प्रकरणात माझ्या वडील आणि भावाला चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली आहे. त्यांची तातडीने सुटका करावी,” अशी मागणी शिवानीने पोलिसांकडे केली.
या घटनेमुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तपासातील हलगर्जीपणा आणि निष्कर्ष काढण्यात झालेल्या घाईबाबत सर्वत्र चर्चा सुरू झाली होती.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने प्रशासकीय कारवाई केली. यामध्ये पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि नितीन पाटील यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार एजाज रफिक खान, अमोल रमेश शेजोळ आणि आदिल रहमान परसुवाले यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील मूळ मृतदेह नेमका कोणाचा आहे, तसेच तपासात झालेल्या त्रुटींबाबत पुढे कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.