किनगाव राजा मर्डर प्रकरणात अपडेट! मारेकऱ्यांनी आधी गळा चिरला, डाव्या पायाची बोटे कापली,नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न! पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध केला खुनाचा गुन्हा दाखल;
महिलेची शोध पत्रिका प्रसिद्ध; अंगात JOCKEY कंपनीचा निकर,डाव्या पायाला ६ बोटे? गोऱ्या रंगाची होती महिला! तुम्ही ओळखता का? बातमीत पहा फोटो...
May 30, 2024, 17:25 IST
किनगावराजा(निलेश डिघोळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): किनगावराजा- सिंदखेडराजा रस्त्यावरील पिंपळगाव लेंडी शिवारात गायके ढाब्याच्या मागे एका महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने आज सकाळी एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आले आहे. मारेकऱ्यांनी महिलेचा आधी गळा चिरून खून केला, डाव्या पायाची बोटे कापली आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलीस पंचनाम्याअंती समोर आले आहे. घटनास्थळी एसपी सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी, एलसीबी प्रमुख अशोक लांडे , अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आला असून पोलिसांनी मृतक महिलेची शोधपत्रिका प्रसिद्ध केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिला अंदाजे २० ते २५ वर्षे वयाची असावी. महिलेचा आधी अज्ञात ठिकाणी धारधार शस्त्राने गळा कापून खून करण्यात आला. डाव्या पायाची बोटे कापण्यात आली त्यानंतर पिंपळगाव लेंडी शिवारातील गायके यांच्या ढाब्यामागे असलेल्या एका पडक्या खोलीमागे हा मृतदेह आणून टाकण्यात आला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेच्या अंगावरील कपडे आगीमुळे जळाली असून जॉकी कंपनीचा काळ्या रंगाचा निकर महिलेने परिधान केलेला असल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या शोधपत्रिकेत म्हटले आहे.
डाव्या पायाची बोटे का कापली?
मारेकऱ्यांनी महिलेच्या डाव्या पायाची बोटे कापलेली आहेत. पायाला असलेल्या जखमेवरून महिलेच्या डाव्या पायाला सहा बोटे असावीत असे दिसते. ६ बोटांमुळे महिलेची ओळख पटण्याची भीती मारेकऱ्यांना असावी त्यामुळेच ती बोटे कापण्यात आली असावी असा पोलिसांना संशय आहे. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला असून घटनेचा तपास किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद नरवाडे करीत आहेत.