खामगाव हादरले; सावकारीच्या जाचाने शेतकऱ्याचा बळी; दीड लाखांच्या कर्जावरून २० लाखांची मागणी: तिघांविरुद्ध गुन्हा दाखल...
भास्कर लक्ष्मण तायडे (वय ५५, रा. भीमनगर, वाडी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आरोपी सोमेश्वर नामदेव दामोदर (वय ६१), प्रवीण संतोषराव खारोडे उर्फ निखिल देशमुख (वय ३७) आणि विजय त्र्यंबक इंगळे (वय ४५) यांच्याकडून १ लाख ४९ हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात शेतजमीन गहाण ठेवण्यात आली होती.
तायडे यांनी कर्जाची रक्कम परत केल्यानंतर शेती पुन्हा त्यांच्या नावावर करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आरोपींनी नियत बदलत तब्बल २० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केल्याचा आरोप आहे. या मागणीसाठी वारंवार मानसिक त्रास देण्यात येत असल्याने तायडे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी गजानन तुळशीराम वाघोदे (वय ५९, रा. तायडे कॉलनी, खामगाव) यांच्या फिर्यादीवरून खामगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३(५) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(२)(५) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.
चिठ्ठीत आरोपींचा उल्लेख
आत्महत्येपूर्वी तायडे यांनी आरोपींच्या नावाने चिठ्ठी लिहिल्याची माहिती समोर आली आहे. सावकारीच्या वाढत्या जाचामुळे घेतलेले हे टोकाचे पाऊल असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे खामगाव परिसरात संताप व्यक्त होत असून, सावकारीविरोधातील कारवाई आणि शेतकऱ्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शेती वाचवण्यासाठी घेतलेले कर्जच जीवघेणे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.