खामगाव हादरलं! ‘तुझं कोणासोबत लफडं आहे?’ म्हणत पतीचा संताप अनावर; बेसबॉल स्टिकने पत्नीला संपवलं, अकोल्याला नेताना मृत्यू

 
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला बेसबॉलच्या स्टिकने बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना खामगाव शहरातील गोपाळनगर घरकुल परिसरात घडली. ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गणेश डाबेराव याच्या घरातून आरडाओरड आणि भांडणाचा आवाज ऐकून शेजारी रोहन देविदास घोडाम यांनी धाव घेतली. त्यावेळी गणेश हा पत्नी लक्ष्मी डाबेराव यांच्याशी चारित्र्याच्या संशयावरून वाद घालत होता. वाद विकोपाला गेल्यानंतर त्याने घरातील बेसबॉल स्टिकने लक्ष्मी यांच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर जोरदार वार केले. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मी यांना तातडीने सामान्य रुग्णालय, खामगाव येथे दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने अकोला येथे हलवित असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहन घोडाम यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला. 
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील आणि पोलीस निरीक्षक मंदारपुरी यांनी पहाटे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी आरोपी पती गणेश डाबेराव याला अटक केली आहे. या धक्कादायक हत्येने गोपाळनगर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकटे करीत आहेत.