काकणवाडा बु. परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; पाच शेळ्या ठार, पहाटे कोठ्यावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण...
 

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा बु. येथे आज पहाटे बिबट्याने धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली. येथील रहिवासी गजानन देवराव हिप्परकार यांच्या कोठ्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून पाच शेळ्या जागीच ठार केल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने वनविभागाला कळवले. दरम्यान, काकणवाडा बु. व परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकरी व पशुपालकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी जनावरे बांधणे तसेच शेतात जाणे धोक्याचे ठरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वनविभागाने तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन परिसरात पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी तसेच नुकसानग्रस्त पशुपालकाला त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बिबट्याचा वावर असल्याने शेतकर्यासह शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण आहे.