देऊळगाव राजात बसस्थानकावर महिलेच्या पर्समधून दागिने केले लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल...

 
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील बसस्थानक परिसरात प्रवासादरम्यान महिलाच्या पर्समधील सुमारे ९० हजार रुपयांच्या सोन्याचे दागिणे चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास मुरलीधर बळप (वय ३७, रा. शेलोडी ता. चिखली, जि. बुलढाणा; सध्या गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या पत्नी कल्पना बळप या मुलगा पार्थ व नातेवाईकांसह गावाकडे जाण्यासाठी देऊळगाव राजा बसस्थानकावरून त्र्यंबकेश्वर–चिखली एस.टी. बस (क्र. एमएच २० सीजी २९०४) मध्ये बसल्या होत्या.
यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याची पोथ, पेंडल, मोठे मणी आदी मिळून अंदाजे तीन तोळे वजनाचे व सुमारे ९० हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. घटनेनंतर संबंधित महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत साळवे आणि इतर करीत आहेत. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.