१८ पूर्ण नव्हते पण तरीही घरचे तीच लग्न लावून देणार होते! मग तिनं जे केलं त्याच सगळ्यांनीच केलं कौतुक...एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह...! बुलढाण्याजवळच्या दहीदची घटना

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तीच वय कोवळ.. लग्नाचं वय नव्हतंच.. पण घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं.. सगळं काही ठरलं, नवरदेव, बस्ता, वस्ता, देणं – घेणं...! पण तिला हे मान्य नव्हतं..अखेर तिनेच धाडसी निर्णय घेतला..११२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला.. घटनेचे गांभीर्य ओळखून बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष रोही यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित पथक घटनास्थळी रवाना केले, तातडीने कारवाई केली आणि होणारा बालविवाह थांबवला.. मुलीच्या या धाडसाचे, समय सुचकतेचे ठाणेदारासह प्रशासनाच्या यंत्रणेने कौतुक केले..
पोलिस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड व उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. भारत खंडारे, पोकॉ. अनंता पाटील, चालक पोहेकॉ. लक्ष्मण सोळंकी यांच्या पथकाने दहीद बु. येथे धाव घेतली.घटनास्थळी ग्रामसेविका मनीषा पवार, पोलिस पाटील श्रीकृष्ण राऊत, अंगणवाडी सेविका रेखा सुरुशे, सरपंच अर्जुन दांडगे तसेच चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक शेख सोहेब शेख हाफीस, चाईल्ड हेल्पर मुकेश मोरे आणि केस वर्कर यांना पाचारण करण्यात आले. सर्वांच्या समन्वयातून बालविवाह यशस्वीरित्या थांबविण्यात आला.

दरम्यान, संबंधित बालिकेला तिच्या आईसमवेत बाल कल्याण पथकाकडे हजर करण्यात आले असून, बाल न्याय मंडळाच्या आदेशानुसार तिला बालगृहात दाखल करण्यात आले आहे. तसेच संबंधित पालक व आयोजकांना कायदेशीर कारवाईबाबत इशारा देण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा घटनांविरोधात नागरिकांनी सजग राहून त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक आशीष रोही यांनी केले आहे.