हल्लेखोरांचा उद्देश चाेरी की हत्‍या?

टायमिंग अन्‌ तयारीनिशी आल्याने व्यापाऱ्यांत चर्चा, मुलाच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्‍हा दाखल, हल्लेखोरांचा युद्धपातळीवर शोध सुरू, चिखलीत पाळला गेला कडकडीत बंद!
 
 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथील व्यापारी कमलेश पोपट यांच्या निर्घृण हत्‍येमुळे चिखली हादरले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज, १७ नोव्‍हेंबरला सर्व व्यापारी संघटनांनी व भाजपने चिखली बंदचे आवाहन केले होते. चिखलीकरांनी कडकडीत बंद पाळला. दरम्यान, कमलेश पोपट यांचा मुलगा मनन (२७) यांच्या तक्रारीवरून चिखली पोलीस ठाण्यात तीन हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कमलेश यांची हत्या करून चोरट्यांनी एक सोन्याची चैन (किंमत अंदाजे ४० हजार) आणि १५ ते २०  हजार रुपये एवढी रोख रक्कम चोरून नेली. एवढ्या कमी रकमेसाठी कमलेश यांचा खून केला की हा पूर्वनियोजित कट होता, अशी चर्चा सुरू व्यापाऱ्यांमध्ये सुरू झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा हल्लेखोर खून करण्याच्या उद्देशानेच दुकानात शिरल्याचे दिसून येत असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यातही कमलेश दुकानात एकटे असतानाची वेळ हल्लेखोरांनी निवडल्याने व हल्लेखोर पूर्ण तयारीनेच आत शिरल्याने हा हल्ला हत्या करण्यासाठीच केल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक अमोलकुमार बारापात्रे तपास करत आहेत.