"१२ किलो रेशनऐवजी १५ किलोची नोंद; कमी धान्याचा जाब विचारताच मारहाण! रेशन दुकानदार आणि वडिलांविरुद्ध गुन्हा"! सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबादची घटना..
तक्रारीनुसार, तक्रारदार यांना रेशन दुकानातून वारंवार कमी धान्य मिळत होते. २९ जुलै २०२६ रोजी त्यांच्या नावावर १२ किलो रेशन मिळाले असताना प्रत्यक्षात १५ किलो रेशन मिळाल्याची नोंद दाखविण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी याबाबत आक्षेप घेतला नव्हता.
त्यानंतर ३१ जुलै रोजी तक्रारदार रेशन दुकानात गेले असता दुकानदाराने त्यांना, "तुझ्या भावाचे रेशन तुलाच आधी दिले आहे, आता रेशन संपले आहे," असे सांगितले. यावर तक्रारदाराने कमी धान्य दिले जात असल्याचा तसेच पावतीही दिली जात नसल्याचा जाब विचारला.
याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीला "तू लय शहाणा झाला का?" असे म्हणत शिवीगाळ केली आणि काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला, पायाला, मानेवर आणि हातावर दुखापत झाली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करत फिर्यादीची सुटका केली. त्यानंतर त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना जालना येथे रेफर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर फिर्यादीने सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी रेशन दुकानदार आणि त्याच्या वडिलांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.