"माझ्या भावाला नदीत उडी मारण्यासाठी प्रवृत्त केले; हा अपघात नाही, हत्या!" मृतकाच्या भावाचा गंभीर आरोप; सखोल चौकशीची जलंब पोलिसांकडे मागणी! 

 
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पूर्णा नदीत उडी मारल्यानंतर झालेला आपल्या भावाचा मृत्यू हा साधा अपघात नसून त्यामागे मित्रांची चिथावणी आणि निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप मृतकाच्या भावाने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जलंब पोलिसांकडे केली आहे.
याबाबत विलास शंकरराव मिरगे यांनी २३ मे रोजी जलंब पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, किशोर प्रांतरगत मिरगे (वय ३७, रा. भास्तन) हे त्यांचे मित्र शिवाजी श्रीकृष्ण मिरगे, ज्ञानेश्वर रामकृष्ण मिरगे (दोघेही रा. भास्तन) तसेच शेषराव मोरखडे (रा. चोंढी टाकळेश्वर, ता. संग्रामपूर) यांच्यासह गाडीतून भेंडवळ येथे गेले होते.

परत येत असताना त्यांनी पूर्णा नदी पुलावर वाहन थांबविले. त्यावेळी शिवाजी मिरगे नदीत पोहत होता. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, याचवेळी शिवाजी मिरगे याने चिथावणीखोर शब्द वापरत किशोर मिरगे यांना पुलावरून नदीत उडी मारण्यास प्रवृत्त केले. विशेष म्हणजे किशोर यांना पोहता येत नसल्याची माहिती त्यांच्या मित्रांना होती. तरीदेखील त्यांना उडी मारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

उडी मारल्यानंतर किशोर मिरगे पाण्यात बुडू लागले. मात्र, त्यांना वाचविण्यासाठी शिवाजी मिरगे पुढे आला नाही, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच हा संपूर्ण प्रकार तेथे उपस्थित असलेल्या शकील (रा. माटरगाव) यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

या सर्व घटनाक्रमामुळे किशोर मिरगे यांचा मृत्यू हा अपघाती नसून त्यांची हत्या झाल्याचा आरोप विलास मिरगे यांनी केला आहे. संबंधित सर्व व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.दरम्यान, या तक्रारीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिस या आरोपांची पडताळणी करून पुढील तपास करीत आहेत.