मलकापूरात १ लाखांचे मिळायचे १० लाख! मग पोलिसांनी सत्य शोधलं...चार आरोपी पकडले, एकाने तर पोलिस अधिकाऱ्यालाच लावला चाकू....

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):कमी पैशांत जास्त रक्कमेच्या नोटा देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मलकापूर येथे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून २  लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून “१ लाख दिल्यास १० लाखांच्या नोटा मिळतील” असे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केली जात होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईचे आदेश दिले होते.

दि. ७ एप्रिल रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने मलकापूर शहरात सापळा रचून कारवाई केली. यातअमोल रमेश गोरे (वय 25, मलकापूर),भारत मथुकर वानखडे (रा. मलकापूर),अविनाश सुनील तायडे (वय 22, मलकापूर)
आणि चेतन गुलाबराव पाटील (वय 25, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)यांना अटक करण्यात आली.

कारवाईदरम्यान आरोपींनी पोलिसांवर चाकूच्या सहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून १५०० रुपये रोख, ‘चिल्ड्रेन बँक’ असे लिहिलेल्या ९ लाख रुपयांच्या बनावट नोटा, २ चाकू, ६ मोबाईल फोन आणि २ दुचाकी असा एकूण २ लाख १हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली.