देऊळगाव राजात चोरट्यांचा हैदोस, तिन मंदिरे फोडली; ५६ हजारांचा सोन्या–चांदीचा ऐवज लंपास; चौंडेश्वरी, चतुशिंगी देवी व कोंडवाडा मारुती मंदिरात चोरी : चोरट्यांचा कसून शोध सुरू; एलसीबीची तीन पथके स्थापन...
फिर्यादी विनोद पन्हाळे हे चौंडेश्वरी मंदिराजवळ ‘श्री चौंडेश्वरी’ नावाचे जनरल स्टोअर्स चालवून उदरनिर्वाह करतात. तसेच ते गेल्या ३० वर्षांपासून चौंडेश्वरी मंदिर संस्थानचे सचिव म्हणून कामकाज पाहत आहेत. सध्या मंदिराच्या जुन्या ढाच्याचे पाडकाम करून नवीन बांधकाम सुरू असून, देवीची उत्सवमूर्ती गाभाऱ्यात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. दि. २२ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ६ वाजता मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेले शेजारी किशोर कचरू सपाटे यांना उत्सवमूर्ती दिसून आली नाही. त्यांनी ही बाब मंदिर समितीला कळविल्यानंतर पाहणी केली असता, देवीची उत्सवमूर्ती तसेच तिच्यावरील सोन्या–चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन अज्ञात इसम चोरी करताना दिसून आले.
चोरट्यांनी चांदीची पाटली, चांदीचा टोप, चांदीचा कंबरपट्टा, सोन्याचे डोरले, पंचधातूची देवीची उत्सवमूर्ती व सोन्याची पोत, पंचधातूची बाळकृष्ण मूर्ती तसेच पूजेचा शंख असा १४ हजार ४९५ रुपयांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान, याच रात्री धोंडीराम महाराज मठ येथील चतुशिंगी देवी मंदिर (जुना जालना रोड) तसेच कोंडवाडा मारुती मंदिर येथेही चोरी झाल्याची माहिती मंदिर समिती सदस्य भारत अप्पा घेवारे (वय ७१) यांनी दिली. या दोन्ही मंदिरांतून सोन्याची नथ, सोन्याचे डोरले, चांदीचा टोप, दानपेटीतील रोख रक्कम व चांदीचे डोळे असा ४१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. अशी एकूण तीन मंदिरांमधून सुमारे ५५ हजार ९९५ रुपयांचा सोन्या–चांदीचा ऐवज व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी दि. २१ जानेवारीच्या रात्री ते २२ जानेवारीच्या पहाटे दरम्यान चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या सलग मंदिरफोडीमुळे देऊळगाव राजा शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) तीन पथके तपासासाठी रवाना करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, अविनाश जायभाय व पंकज सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. तसेच घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. शहरातील गल्लीबोळातून माग काढत काही अंतरावर श्वानपथक थांबले.
दरम्यान, प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी संतोष खाडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक ब्रह्मागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, अज्ञात चोरट्यांचा शोध वेगाने घेतला जात आहे.