मांजर-बोक्याच्या भांडणात नांदुऱ्यात अग्नितांडव.... मांजरीची डीपीवर उडी, बोक्याही डीपी वर चढला...! नेमकं काय झालं....

 
 नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ शनिवारी रात्री मांजर व बोक्याच्या भांडणातून धक्कादायक प्रकार घडला. या भांडणात मांजरीने जीव वाचवण्यासाठी वीज वितरण केंद्राच्या (डिपी) दिशेने उडी घेतली. पाठलाग करत बोकाही डिपीवर चढला. दोघांच्या झटापटीत विजवाहिनीत शॉर्टसर्किट होऊन ठिणग्या खाली पडलेल्या कचऱ्यावर पडल्या. त्यातून कचऱ्याने पेट घेतला आणि काही क्षणातच डिपीनेही पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली.

ही घटना रात्री सुमारे साडेअकरा ते साडेबारा या वेळेत घडली. आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. भाजपाचे नेते सुधीरामभाऊ मुन्हेकर, शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे आणि कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी एक तासात आग आटोक्यात आली.
डिपीला लागलेल्या या आगीत मांजर आणि बोक्याचा होरपळून मृत्यू झाला. दोघांचेही मृतदेह आगीत भाजलेल्या अवस्थेत आढळून आले. या आगीत वीज मंडळाच्या डिपी आणि वाहिन्या जळून सुमारे चार लाखांचे नुकसान झाल्याचे वीज विभागाने सांगितले.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी ही आग लागली त्या डिपीच्या समोरच ऑटो स्पेअर पार्ट्स आणि टायर विक्रीची दुकाने आहेत. आगीवर त्वरित नियंत्रण मिळाल्याने ही दुकाने वाचली. अन्यथा मोठ्या वित्तीय नुकसानाची शक्यता होती. दुकाने वाचल्याने व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
नगरपालिकेजवळील डाक कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या या दोन मजली व्यापारी संकुलात दररोज मोठी वर्दळ असते. त्यामुळे अशी घटना दिवसा घडली असती, तर गंभीर अनर्थ ओढवला असता, असेही नागरिकांनी सांगितले.