बुलडाण्यात बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश! डॉक्टर ताब्यात, उपकरणे जप्त;
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या पथकाची कारवाई...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :सामाजिकदृष्ट्या घातक आणि कायद्यानं निषिद्ध असलेल्या बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणावर बुलडाण्यात पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने सुंदरखेड परिसरात धाड टाकत अवैध गर्भलिंग निदानाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.
गुरुवार, ६ नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहरातील तार कॉलनी, सुंदरखेड परिसरातील डॉ. कैलास गवई यांच्या निवासस्थानी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने छापा टाकला. तपासादरम्यान त्यांच्या घरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र सुरू असल्याचे समोर आले.
या वेळी पोलिसांनी डॉ. गवई यांना ताब्यात घेतले असून, ठिकाणावरून गर्भलिंग तपासासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.
जिवंत लेकराचा गळा घोटणाऱ्या या विकृत आणि अमानवी कृत्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. महिलांविरुद्ध अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि पोलिस विभागाने संयुक्त तपास सुरू केला असून, या अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा माग काढण्यासाठी पुढील छाननी सुरू आहे.
या धाडीतून बुलडाणा शहरात पुन्हा एकदा बेकायदेशीर गर्भलिंग निदानाचे जाळे सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.