रेतीचा अवैध उपसा :महसूल विभागाची धाडसी कारवाई; आठवड्यात तीन टिप्पर केले जप्त...
Feb 12, 2026, 18:50 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्र व धरण क्षेत्र अवैध रेती उत्खनन व वाहतुकीचे हॉटस्पॉट बनले असून, या तस्करीविरोधात महसूल विभागाने कठोर कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या आठवड्यात अवैध रेती वाहतूक करणारे तीन टिप्पर पकडून जप्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात अवैध रेती उपसा व तस्करीला आळा घालण्यासाठी स्थानिक महसूल पथक, जिल्हास्तरीय अधिकारी व पोलीस प्रशासन सातत्याने कारवाई करत आहेत. तरीही काही ग्रामपातळीवरील कर्मचाऱ्यांकडून कारवाईची माहिती तस्करांना दिली जात असल्याच्या चर्चेमुळे अनेकवेळा पथकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याची बाब समोर येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती असूनही संबंधितांवर कारवाई न झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पथकाने पहाटे गस्तीदरम्यान नारायणखेड परिसरात एमएच-17 सीव्ही-0413 क्रमांकाचा टिप्पर अवैध रेती वाहतूक करताना रंगेहात पकडला. कोणताही परवाना नसल्याने सुमारे तीन ब्रास रेतीसह टिप्पर जप्त करून अंढेरा पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी ठेवण्यात आला आहे.
७ फेब्रुवारी रोजी नायब तहसीलदार सायली जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाफराबाद चौफुली परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पाठलाग करून पकडण्यात आला. संबंधित वाहन देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आले.
३ फेब्रुवारी रोजी दिग्रस बुद्रुक (खडकपूर्णा धरण क्षेत्र) येथे रात्रीच्या वेळी अवैध रेती उत्खनन करून वाहतूक करणारा टिप्पर आढळून आला. कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याने तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी तो टिप्पर जप्त करून अंढेरा पोलीस ठाण्यात सुपूर्द केला.
या कारवाईत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, ग्राम महसूल अधिकारी आकाश खरात, ज्योती लोखंडे, महसूल सेवक कविता शिरसाठ, परमेश्वर बुरुकुल, विठ्ठल हरणे, महसूल अधिकारी गजानन टेकाळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.
अवैध रेती तस्करीविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.