खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उपसा; दोन बोटींसह २७.२० लाखांचा मुद्देमाल नष्ट, अज्ञातांविरुद्ध गुन्हा...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खडकपूर्णा जलाशय परिसरात छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान अज्ञात बोट चालक व अज्ञात मालक हे त्यांच्या मालकीच्या दोन बोटींच्या साहाय्याने जलाशयातून अवैधरित्या रेती उपसा करून चोरी करत असल्याचे आढळून आले. घटनास्थळी अवैध रेती व चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य मिळून आले. या कारवाईत जप्त करण्यात आलेला एकूण २७,२०,००० रुपयांचा मुद्देमाल शासकीय पंचनामा करून नष्ट करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.५३ वाजता दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांचे मार्गदर्शनाखाली पोनि ब्रम्हा गिरी,सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवदास गीते, पोलीस हवालदार रामकिसन गीते,माधव कुटे, विजय दराडे,पोका ज्ञानेश्वर वायाळ, गजानन काकड यांच्यासह महसूल व खडकपूर्णा प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी केली.
दरम्यान, जलाशय परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशामुळे पर्यावरणासह शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याने अशा कारवाया सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.