मला घरी यायला उशीर होईल म्हणाले अन्....! पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या! किनगावराजा पोलीस ठाण्यात होते कार्यरत

 

किनगाव राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  किनगावराजा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल अशोक अशोक संभाजी चाटे (वय ५६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. दुर्धर आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या नोंदीतून मिळाली आहे.

देऊळगावराजा येथे राहत असलेल्या अशोक चाटे यांचा मुलगा अक्षय अशोक चाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अशोक चाटे यांनी १० नोव्हेंबर रोजी बाहेरून फिरून येतो म्हणून देऊळगावराजा येथून निघून गेले. दरम्यान, उशीर झाल्याने त्यांना फोनवरून संपर्क साधला असता मला घरी यायला उशीर होईल, असे उत्तर दिले. त्यानंतर उशिरा त्यांना फोन केला असता ते फोन उचलत नसल्याने मित्र संतोष मधुकर सोनोने याच्यासोबत सर्वप्रथम देऊळगावराजा येथे शोध घेतला. दरम्यान, ते मिळून न आल्यामुळे किनगावराजा येथे त्यांनी भाड्याने घेतलेल्या रूममध्ये रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पहिले असता छताच्या पंख्याला पांढऱ्या रंगाच्या लांब रुमालाने गळफास घेतल्याचे आढळून आले. 

अशोक चाटे यांनी आजाराला कंटाळूनच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादी अक्षय चाटे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले असून घातपाताचा कुठलाच संशय नसून पुढील तपास पोलिसांनी करावा, अशी माहिती अक्षय चाटे यांनी पोलिसांना दिली आहे. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून ठाणेदार दत्तात्रय वाघमारे यांच्या आदेशानुसार ठाणे अंमलदार शरद ठोंबरे यांनी कलम १७४ नुसार नोंद केली आहे.