‘तू मला आवडतेस...’ म्हणत पाठलाग; मग थेट ५ लाखांची मागणी! नेमकं प्रकरण काय?

 
 देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महिलेचा सातत्याने पाठलाग करणे, वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन करून त्रास देणे तसेच तिची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून देऊळगाव राजा पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रवी रामदास पिंपळे (रा. समता कॉलनी, देऊळगाव राजा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. महिलेच्या तक्रारीवरून १८ सप्टेंबर रोजी हा गुन्हा नोंदविण्यात आला.

तक्रारीनुसार, आरोपी रवी पिंपळे हा महिलेचा सातत्याने पाठलाग करून ‘तू मला आवडतेस, तुझ्यासोबत संसार करायचा आहे,’ असे म्हणत असल्याचा आरोप आहे. तसेच त्याने महिलेची काही छायाचित्रे काढली असून, ती समाजमाध्यमांवर प्रसारित न करण्यासाठी तिच्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यास तिच्या पतीसह मुलांचे अपहरण करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याशिवाय, स्वतः आत्महत्या करून महिलेला खोट्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, १८ सप्टेंबर रोजी महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी रवी रामदास पिंपळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.