दुबार –तिबार पेरणी करावी लागली! जामठीच्या युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून संपवले जीवन....

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा तालुक्यातील जामठी येथील युवा शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार तिबार पेरणी करावी लागली..सावकारी आणि सहकारी पतसंस्थाचे वाढत चाललेले कर्ज यामुळे मेटाकुटिस आल्याने शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. शरद नारायण तायडे असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचे वय अवघे ३८ वर्षाचे होते.

​​​​

प्राप्त माहितीनुसार शरद तायडे यांनी २२ ऑगस्टच्या दुपारी शेतात विषारी औषध प्राशन केले. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तायडे यांच्याकडे वडिलोपार्जित ४–५ एकर शेती होती. यंदा त्यांना निसर्गाच्या लहरीपणामुळे दुबार तिबार पेरणी करावी लागली. पिकांचे मोठे नुकसान झाले, सावकारांकडून काही उसने घेतलेले पैसे, बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. यातच त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर येत आहे.