कुटुंबासह बाहेरगावी गेले होते, वहिनीचा फोन आला अन्...इब्राहीमपूरमध्ये धक्कादायक घडलं! बोराखेडी पोलिसांत गुन्हा दाखल...

 
 मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):तालुक्यातील इब्राहीमपूर येथे बंद घर फोडून शेतमाल विक्रीतून ठेवलेली तब्बल अडीच लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बोराखेडी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनिल सावजी श्रीनाथ (रा. इब्राहीमपूर) यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, श्रीनाथ हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या वहिनी यांनी दूरध्वनीवरून घरातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले असून पेटीचे कुलूप तुटल्याची माहिती दिली.
ही माहिती मिळताच अनिल श्रीनाथ व त्यांची पत्नी तातडीने घरी परतले. घराची पाहणी केली असता पेटीत ठेवलेले मका व गहू विक्रीचे सुमारे २ लाख ५० हजार रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील इतर ठिकाणी शोध घेतला असता रक्कम कुठेही मिळून आली नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात प्रवेश करून पेटीचे कुलूप तोडत रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अलिकडच्या काळात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून, चोरीच्या गुन्ह्यांचा तपास व उलगड्यांचे प्रमाण अत्यंत कमी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गस्त वाढवून अशा गुन्ह्यांवर आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.