पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न; पतीचा मृत्यू, पत्नी बचावली:नापिकी व कर्जबाजारीपणातून टोकाचे पाऊल...
Feb 11, 2026, 09:42 IST
मेरा बु. (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाच्या नैराश्यातून शेतकरी कुटुंबातील पती-पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत पतीचा मृत्यू झाला असून पत्नी उपचारांमुळे बचावली आहे. ही घटना १० फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली.
अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरा बु. येथील वंदना सखाराम दाभाडे यांच्याकडे गट क्रमांक १५३ मध्ये दोन एकर कोरडवाहू जमीन आहे. जमीन कमी असल्याने कुटुंबातील सदस्य स्वतःच्या शेतात काम करण्यासोबतच इतरांच्या शेतात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्र, मेरा खुर्द शाखेकडून सुमारे एक लाख रुपयांचे पीककर्ज घेऊन सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती.
मात्र यंदाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. त्यामुळे कर्जफेडीची चिंता वाढून घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या नैराश्यातून वंदना दाभाडे यांचा मुलगा संतोष सखाराम दाभाडे (वय ३४) आणि त्याची पत्नी यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले.
घटनेची माहिती मिळताच गावातील कोतवाल सचिन पडघान व ग्रामस्थांनी तत्काळ दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालय, बुलढाणा येथे दाखल केले. उपचार सुरू असताना संतोष दाभाडे यांचा मृत्यू झाला, तर पत्नीवर उपचार सुरू असून तिचा जीव वाचला आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे मेरा बु. गावात शोककळा पसरली असून शेतकरी कुटुंबांवरील आर्थिक संकट पुन्हा एकदा समोर आले आहे.