थरार..गुजरातच्या व्यापाऱ्याची समृद्धी महामार्गावरील लूट! बंदुकीचा धाक दाखवला, गाडीत बसवून जंगलात सोडले! बुलढाण्याच्या टीम एलसीबीने २४ तासांत आरोपींना केले गजाआड; वाचा कसा घडला थरार...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गावर व्यापाऱ्याला लुटणाऱ्या आंतरराज्य दरोडेखोर टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने धाडसी कारवाईत पर्दाफाश करत आठ आरोपींना जेरबंद केले. या कारवाईत पिस्टल, जिवंत काडतुसे, वाहने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील बनासकाठा जिल्ह्यातील अभयसिंह आनंदसिंह वाघेला (वय ३२) यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ते २ मे रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता धान्य व्यापारासाठी १२ लाख रुपये घेऊन स्कॉर्पिओ वाहनाने नागपूरहून गुजरातकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावरील दुसरबीड टोलनाक्याजवळ टायर तपासत असताना मागून आलेल्या बोलेरो व इनोव्हा वाहनांमधून १० ते १२ जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत त्यांना त्यांच्या वाहनात बसवण्यात आले आणि त्यांची स्कॉर्पिओ व १२ लाखांची रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेण्यात आली. त्यानंतर वाघेला यांना जालना जिल्ह्यातील जंगल परिसरात सोडून देण्यात आले.
या घटनेनंतर किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान आरोपी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील अंबा साखर कारखाना परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ कारवाई करत अंबाजोगाई येथे सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने आठ आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेले आरोपी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि जम्मू काश्मीर येथील असून ते आंतरराज्य पातळीवर गुन्हे करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचे उघड झाले आहे.
आरोपींकडून १ लाख ८० हजारांची रोख रक्कम, देशी बनावटीची पिस्टल, चार जिवंत काडतुसे, इनोव्हा व बोलेरो अशी दोन वाहने, चार मोबाईल, दोन वायफाय उपकरणे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली .पुढील तपास किनगाव राजा पोलीस ठाणे करीत आहे.