धरणगाव–धुपेश्वर मार्गावर भीषण अपघात; भरधाव कार झाडावर आदळली; तीन युवक ठार, दोघे गंभीर जखमी...
Dec 22, 2025, 09:48 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : धुपेश्वरकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून तीन युवकांचा मृत्यू तर दोघे जखमी झाले.ही दुर्दैवी घटना धरणगाव–धुपेश्वर रोडवर धरणगाव नजीक रविवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे ३.३० वाजता घडली.
मलकापूर शहरातील पाच युवक मलकापूर येथून धुपेश्वरकडे जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे मारुती अर्टिगा (क्र. एमएच-१२ जेसी-७५०८) ही चारचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. या अपघातात रूद्र उमेश पवार (वय १९, रा. सावजी फैल, मलकापूर),विनायक जनार्धन अत्तरकार (वय २०, रा. लक्ष्मीनगर, मलकापूर) आणि गणेश दीपक इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत राजू वनारे व तक्षधुरंधर हे दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मलकापूर शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी हे पोलीस ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि नागरिकांच्या मदतीने जखमींना तत्काळ मलकापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मलकापूर शहरात एकीकडे नगरपरिषद निवडणूक निकालाची चर्चा सुरू असतानाच घडलेल्या या भीषण अपघातामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.