मोताळा तालुक्यात भीषण अपघात; मळणी यंत्रासह ट्रॅक्टर उलटून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
रामचंद्र जाधव व करतार बस्सी यांच्या शेतात तूर मळणीचे काम आटोपल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर व मळणी यंत्र घेऊन ते अहिल्यानगरकडे निघाले. यावेळी ट्रॅक्टर सुरेश गोयकर चालवत होते, तर सौरभ जाधव व महेश जाधव ट्रॅक्टरवर बसले होते. दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास सहस्रमुळी तांडा येथील विलास माहुरे यांच्या शेताजवळ अचानक ट्रॅक्टर मळणी यंत्रासह उलटला.
या अपघातात सौरभ जाधव ट्रॅक्टरखाली दबला, तर सुरेश गोयकर व महेश जाधव हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच प्रकाश प्रभू जाधव घटनास्थळी पोहोचले. पाहणीअंती सौरभ जाधव याचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
जखमी सुरेश गोयकर व महेश जाधव यांना बोराखेडी पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने खासगी वाहनाने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेमुळे सहस्रमुळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.