देऊळगाव मही येथे भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू; मित्र जखमी, देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल...
Dec 20, 2025, 10:02 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पेट्रोल भरण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने एक युवक जागीच ठार तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना देऊळगाव मही–चिखली मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.२५ वाजताच्या सुमारास घडली. विकास रोडीबा बनकर असे मृतक युवकाचे नाव आहे.
या अपघाताबाबत कडुबा प्रल्हाद डोईफोडे (वय ५६, व्यवसाय शेती, रा. डोलखेडा खुर्द, ता. जाफाबाद, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र विकास रोडीबा बनकर हे दोघे मोटारसायकल क्रमांक MH-14-GK-8864 वरून देऊळगाव मही ते चिखली रोडवरील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी १९ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.२५ वाजताच्या सुमारास जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत फिर्यादी कडुबा डोईफोडे हे किरकोळ जखमी झाले, तर त्यांचा मित्र विकास रोडीबा बनकर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुध्द कलम २८१, १२५(अ), १०६(१) भा.न्या.सं. (BNS) सह कलम १३४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार कलीम देशमुख करीत आहेत.