काळीज पिळवटून टाकणारी घटना! पोलीस भरतीदरम्यान धावतांना देऊळगाव राजा च्या तरुणाचा मृत्यू; आई –वडिलांचा एकुलता एक आधार हरपला...
Mar 29, 2026, 10:24 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलीस होण्याचं स्वप्न डोळ्यांत साठवून मैदानावर उतरलेला देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथील २३ वर्षीय तरुण पुरुषोत्तम बुरुकुल याचा भरती दरम्यान २८ मार्च रोजी सकाळी पुणे येथील शिवाजीनगर ग्राऊंडवर मृत्यू झाला.
पोलीस भरती प्रक्रियेत चिंचोली बुरकुल येथील पुरुषोत्तमने दोन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. मात्र तिसऱ्या फेरीत धावत असताना त्याला अचानक चक्कर आली. क्षणात तो मैदानावर कोसळला. उपस्थितांनी तातडीने त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
१६०० मीटर धावण्याच्या या कठीण शर्यतीत स्वतःला सिध्द करण्यासाठी झटणारा परुषोत्तम अखेर तिसऱ्या राऊंडमध्येच कोसळला आणि आयुष्याचीच शर्यत हरला. पुरुषोत्तम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. घरातील आशा, आधार आणि भवितव्य असलेला हा तरुण अचानक निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. २ बहिणींचा तो लाडका भाऊ होता, तर वडील गेल्या काही वर्षांपासून पक्षाघाताने अंथरुणाला खिळलेले आहेत. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबाचा कणा असलेला मुलगाच हरपल्याने आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.
'पोलीस बनून घर उभं करायचं,' या स्वप्नासाठी पुरुषोत्तम दिवस-रात्र मेहनत करत होता. मात्र नियतीने त्याच्या स्वप्नांवर विरजण घालत त्याला काळाच्या पडद्याआड नेलं. बहिणींच्या डोळ्यांतील अश्रू, आईचा हंबरडा आणि वडिलांची निःशब्द वेदना पाहून गावकरीही भावूक झाले आहेत. या घटनेने चिंचोली बुरकुले गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.