म्हणे लग्न करतो... पण नको ते करत राहिला..तरुणीला प्रेग्नेंट केले; मग औषध देऊन गर्भ पाडला! जानेफळच्या तरुणावर गुन्हा...
Jun 21, 2025, 08:57 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून २१ वर्षीय तरुणीचा लैंगिक छळ करण्यात आला. या संबंधातून तरुणी गर्भवती राहिल्यानंतर संबंधित तरुणाने लग्नास नकार देत तिचा छळ केला आणि गोळ्या देऊन तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. ही धक्कादायक घटना मेहकर शहरात समोर आली असून, या प्रकरणी जानेफळ येथील तरुणाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पीडित तरुणी ही ग्रामीण भागातील असून, मेहकर येथे शिक्षणासाठी राहत होती. आरोपी सतीश सुरेश भुजंगे (वय ३०, रा. जाणेफळ) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून १८ ऑगस्ट २०२३ पासून ११ जून २०२५ या कालावधीत वेळोवेळी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिने लग्नाचा आग्रह धरला असता आरोपीने स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे, तर तिला धमक्या देत जबरदस्तीने औषधांच्या सहाय्याने गर्भपातही घडवून आणल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून सतीश भुजंगेविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणाचा तपास मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.