कुलूप तोडून घरात शिरला अन... शिक्षक कुटुंब परतल्यावर समोर आलं धक्कादायक वास्तव! बुलडाणा शहरातील घटना..
मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम शालीकराम बोऱ्हाडे हे कोलवड येथील राजीव गांधी मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते शिवराजनगर, बुलढाणा येथे कुटुंबासह राहतात. २८ जून रोजी दुपारी ते कुटुंबासह मेहकर तालुक्यातील मूळगाव खंडाळा देवी येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी गेले होते.दुसऱ्या दिवशी, २९ जून रोजी घरी परतल्यानंतर त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी एकूण १ लाख ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी घनश्याम बोऱ्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळावरील पुरावे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, बंद घरांवर पाळत ठेवून चोरी करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा शहरात सुरू असून नागरिकांनी घर दीर्घकाळ बंद ठेवताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.