सासरकडून हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा...
Feb 16, 2026, 14:46 IST
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : हुंड्यासाठी सतत तगादा आणि कौटुंबिक छळाला कंटाळून २९ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांसह एकूण सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मृत महिला मूळ तेल्हारा तालुक्यातील चांगलवाडी येथील रहिवासी होती. पाच वर्षांपूर्वी तिचा विवाह निमगाव येथील तरुणाशी झाला होता. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू असताना काही दिवसांनी पती व सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करण्यात येऊ लागली. मागणी पूर्ण न झाल्याने टोमणे, मानसिक-शारीरिक छळ आणि मारहाण सुरू असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा छळ ऑगस्ट २०२१ पासून ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत सुरू होता, असेही नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार पतीचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळेही वाद वाढत होते. दारूच्या नशेत मारहाण व अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने पीडित महिला तीव्र मानसिक तणावात होती. या दुहेरी छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.