मळणी यंत्रात केस अडकले; शेतकरी महिलेचा जागीच मृत्यू;
ऐन दिवाळीच्या दिवशीच गाेद्री येथील दुर्दैवी घटना...
Oct 22, 2025, 12:36 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : साेयाबीन काढत असताना मळणी यंत्रात केस अडकल्याने महिला शेतकरी जागीच ठार झाली. ही घटना २० ऑक्टाेबर राेजी चिखली तालुक्यातील गाेद्री येथे घडली. कांताबाई गुलाबराव कुटे असे मृत महिलेचे नाव आहे. ऐन दिवाळी सणात गावात ही घटना घडल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांताबाई कुटे यांच्या स्वत:च्या शेतातील साेयाबीनचे खळे करण्यासाठी मळणी यंत्र आले होते. दरम्यान, सोयाबीनची मळणी सुरू असताना कांताबाई यांचे केस मळणी यंत्रात खेचले गेल्याने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी उपस्थित मळणी यंत्र चालक व परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने त्यांना चिखली उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र, डाॅक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घाेषित केले. ऐन दिवाळी सणात ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त हाेत असून, गाेद्री गावावर शाेककळा पसरली आहे.