डोणगावात चोरट्यांचा हैदोस,
दोन ठिकाणी घरफोडी तर एका ठिकाणचा प्रयत्न फसला

 
 डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गावात ११ सप्टेंबरच्या रात्री चोरट्यांनी हैदोस घालत दोन ठिकाणी घरफोडी केली तर एका ठिकाणी चोरट्यांचा प्रयत्न फसला. खंडोबा परिसर व गजानन महाराज न मंदिराच्या पाठीमागे दोन घरी घरफोडी करण्यात आल्या.

खंडोबा परिसरातील आशिष बोहरा यांच्या घरात भाड्याने राहणारे वैभव आखाडे यांच्या अपार्टमेंटमध्ये कुणीही नसल्याचे पाहुन वैभव आखाडे यांच्या दरवाज्याचे कुलूप तोडुन कपाटात न असलेले ३८ ग्रॅम सोने व चांदीचे दागिने, नगदी ४० हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. तसेच गजानन महाराज मंदिराच्या पाठीमागे राहणारे दत्तात्रय आखाडे यांच्या घरात कुणी नसल्याचे पाहून दरवाज्याचे कुलूप तोडून कपाटात असलेली
सोन्याची पोथ व नगदी पंधरा हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. दरम्यान, सोसायटी कॉम्प्लेक्स समोरील संतोष बाजाड यांच्या घरी अज्ञात चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने गेले असता घरात कोणीतरी असल्याचे पाहून पळून गेले. कामानिमित्त बाहेर गेलेले वैभव आखाडे घरी परतल्यानंतर घरातील कपाट अस्ताव्यस्त दिसून आले व आपल्या घरात चोरी झाल्याचे समजल्यानंतर या घटनेची माहिती डोणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार बिरांजे यांनी दोन्ही ठिकाणी पाहणी करून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रदीप पाटील यांनी चोरी झालेल्या ठिकाणची भेट देऊन माहिती घेतली.