आजीबाई प्रवचनाला गेल्या अन्‌ भलतंच संकट घेऊन आल्या!

चिखली शहरातील घटना
 
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रवचन ऐकण्यासाठी गेलेल्या वृद्धेची १४ ग्रॅम सोन्याची पोत कुणीतरी लांबवली. ही घटना शाहूनगरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात २२ नोव्‍हेंबरला दुपारी २ ते ५ दरम्‍यान घडली. चिखली पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 

कौशल्याबाइ रामचंद्र खुनारे (६५ रा. गांधीनगर, चिखली) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. त्‍या पती वारल्याने सध्या मुलगी सौ. शारदा मदन चौधरी यांच्‍याकडे गांधीनगरात राहतात. काल दुपारी दोनला त्‍या घराशेजारील सुशिलाबाई अशोक सोनोने यांच्यासोबत श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रवचन ऐकण्यासाठी गेल्या होत्या. प्रवचनासाठी बरीच गर्दी होती. महाराजांचे प्रवचन पाचला संपले. मंदिरासमोर स्वामी समर्थ महाराजांचे पुस्तके, मुर्त्या, गळ्यातील माळी व इतर धार्मिक साहित्याची दुकाने लागलेली होती. प्रवचन एेकल्यानंतर सामान खरेदी करण्यासाठी कौशल्याबाई मंडपच्या बाहेर आल्या. तेव्हाच माइकमधून गळ्यातील सोन्याचे दागिने सांभाळून ठेवा असा पुकारा झाला. त्‍यामुळे  कौशल्याबाईंनी गळ्यातील सोन्याची गहूपोत पाहिली असता दिसून आली नाही. कुणीतरी ती चोरल्याचे त्‍यांच्‍या लक्षात आले. त्‍यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.