ग्रामसेवक म्हणतो, बियर पिऊन झोपा, मच्छर डसणार नाहीत! कोण आहे अजब गजब सल्ला देणारा हा ग्रामसेवक? लोणार तालुक्यातील प्रकार....
Updated: Sep 19, 2025, 12:47 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यातील शारा गावात ग्रामसेवकाचा अजब सल्ला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही खराब झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकण्याची मागणी पूर्ण न करता ग्रामसेवक रामदास शिंदे यांनी "मच्छर डसतात तर बियर पिऊन झोपा, शांत झोप लागेल," असा सल्ला ग्रामस्थांना दिल्याचे समोर आले आहे.
गावातील वार्ड क्रमांक १ मधील रस्ता पावसामुळे उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सर्वत्र चिखल झाल्याने नागरिकांना जाण्या-येण्यात मोठी गैरसोय होत आहे. खड्ड्यांत पाणी साचल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असून लहान मुले, महिला व वृद्ध विविध आजारांनी त्रस्त झाले आहेत.
या समस्येबाबत ग्रामस्थांनी ग्रामसेवक शिंदे यांना माहिती दिली असता, त्यांनी समस्येकडे दुर्लक्ष करून गावकऱ्यांची थट्टा केली. या मस्तवाल व मुजोर ग्रामसेवकावर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संतोष सूर्यभान डव्हळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.