मित्रासोबत लग्नासाठी निघाला होता वैभव पण मध्येच काळाचा घाला; भरधाव दुचाकीची बसला धडक! मोताळा रोडवरील मूर्ती फाट्यानजीकची घटना..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) कोथळीचा वैभव गणगे हा एका लग्नासाठी मित्रासोबत दुचाकीने जात होता. परंतु मध्येच काळ आला आणि क्षणार्धात वैभव गतप्राण झाला. भरधाव वेगाने जात असलेली दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला धडकली आणि याच धडकेत वैभव गणगे याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसून असलेला त्याचा मित्र राजू बावणे हा गंभीर जखमी आहे. दुपारी २:३० वाजेच्या दरम्यान, मोताळा रोडवरील मूर्ती फाट्यानजीक ही दुर्घटना घडली. 
  एम. एच ४० ए.एन ९९४१ क्रमांकाची परिवहन महामंडळाची बस मेहकर येथून भुसावळला जात होती. त्यावेळी बुलडाणा मलकापूर मार्गावरील मूर्ती फाट्यानजीक एम.एच १९ बि. ए.१२८७ क्रमांक असलेल्या भरधाव दुचाकीने बसला समोरून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी चालवणारा वैभव गणगे याचा जागेवरच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. मागे बसलेला राजू बावणे याला देखील जबर मार लागला. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे.