खोट्या प्रेमसंबंधाची बदनामी सहन न झाल्याने मुलीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल,  मोताळा तालुक्यातील घटना..

 

 मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
प्रेमसंबंधाच्या खोट्या आरोपांनी बदनामी करत मानसिक छळ केला आणि जीवाने मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी मोताळा तालुक्यातील परडा येथील तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत बेबाबाई राजू सोळंके यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपींमध्ये विजू अशोक सोळंके, हिरामण सदाशिव पवार आणि प्रमिला हिरामण पवार (सर्व रा. परडा, ता. मोताळा) यांचा समावेश आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, वरील तिघांनी त्यांच्या मुलगा विश्वजीत याचे पीडित लता राजू सोळंके हिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची खोटी बदनामी केली. तसेच तिला जीवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. या सातत्याच्या छळामुळे लता हिने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवले.
फिर्यादीनुसार बोराखेडी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, PSI राजेंद्र कपले हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.