नांदुरा शहरात दीड लाखांचा गांजा जप्त; एकाला अटक, गुन्हे शोध पथकाची लक्ष्मी नगर ले-आउटमध्ये कारवाई...

 
नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरात विक्रीसाठी आणलेला सुमारे दीड लाख रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त करत एका आरोपीला अटक केली. नांदुरा–जळगाव जामोद मार्गावरील लक्ष्मी नगर ले-आउट परिसरात ९ फेब्रुवारी रोजी ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी शेख अन्वर शेख रशीद (वय ६४, रा. बाळापुर फैल, खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी लक्ष्मी नगर ले-आउट परिसरात गांजा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक राहुल ससाने यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवल्यानंतर कारवाईची योजना आखण्यात आली.

ठाणेदार सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नितीन चव्हाण, एएसआय मिलिंद जवंजाळ, रायटर कैलास सुरडकर, तसेच राहुल ससाने, विनोद भोजने, संदीप डाबेराव, रवि सावळे, सुनील सपकाळ आणि पंकज डाबेराव यांनी लक्ष्मी नगर ले-आउटमध्ये सापळा रचला. दुपारी सुमारे ३.३० वाजता आरोपी संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीत २.९९८ किलो गांजा आढळून आला.

पंचासमक्ष जप्त करण्यात आलेल्या या गांजाची किंमत १ लाख ४९ हजार ९०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस नाईक राहुल ससाने यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७९/२०२६ नोंदविण्यात आला असून, गुंगीकारक औषधी द्रव्य व मानवी मेंदूवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस) कलम ८(क), २०(ब) व २२(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय नितीन चव्हाण करीत आहेत.