चौथ्याचा सराईत दारू विक्रेता तीन महिन्यांसाठी तडीपार; धाड पोलिसांची कडक कारवाई

 
धाड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पोलीस अधीक्षक नीलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला तीन महिन्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चौथा (ता. जि. बुलढाणा) येथील रहिवासी देवसिंग फकीरा बिबे (वय ४०) हा गेल्या काही काळापासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे परिसरातील शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याने धाड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला.
हा प्रस्ताव १७ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) व (ब) अन्वये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत बुलढाणा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून तसेच आरोपीवरील गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित आरोपीला बुलढाणा जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले.
या कारवाईमुळे ग्रामीण भागातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून भविष्यात अशा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाड ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे, पोलीस अंमलदार युवराज मुळे व नितीन माळोदे यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. दरम्यान, अवैध दारू विक्री व इतर बेकायदेशीर धंद्यांवर पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा धाड ठाणेदार प्रताप भोस यांनी दिला आहे.