दोन देशी कट्ट्यांसह चार जिवंत काडतुस जप्त; नांदेड येथील एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई !
Nov 5, 2025, 12:30 IST
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तामगाव पोलीस ठाणे हद्दीत एका आरोपी कडून दोन देशी कट्टयांसह चार जिवंत काडतुस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी तालुक्यातील ग्राम वरवट बकाल येथे काकनवाडा रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांनी नांदेड येथील आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नांदेड येथील आरोपीकडून संग्रामपूर तालुक्यात देशी कट्टयांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, एजाज खान, अमोल शेजोळे, अजीस परसुवाले, शिवानंद हेलगे यांनी तामगाव पोलीस ठाणे हद्दीतील वरवट बकाल येथे सापळा रचून काकनवाडा रस्त्यावर नांदेड येथील पवन वासुदेव कोकाटे या आरोपीकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल व चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीकडून एकुण ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात कलम ३,२५ शस्त्र अधिनियम सहकलम १२३, १३५ मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
सोनाळा पोलिसांनी २७ ऑक्टोबरला मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात अग्नी शस्त्रांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडले होते. मध्यप्रदेशातील (चांदामेठा ता. परासिया, जिल्हा छिंदवाडा) येथील दोन्ही आरोपींकडून ५ स्टील देशी बनावटीच्या कट्ट्यांसह स्टिल मॅगझिन, १६ जिवंत काडतुसे, दोन अतिरिक्त स्टील मॅगझिन असा एकुण ७ लक्ष ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर ही दुसरी कारवाई करण्यात आली आहे.