कुर्‍हाडीने मारहाण करणाऱ्या चार आरोपींना सहा महिन्यांचा कारावास;
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; बोराळा येथे गॅस सिलिंडर वितरणावरून झाला होता वाद..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गॅस सिलिंडर वाटपाच्या दरम्यान झालेल्या वादातून कुर्‍हाडीने हल्ला केल्याप्रकरणी चार आरोपींना सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी ३ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा बुलढाणा जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. खंडाळे यांनी १५ सप्टेंबर रोजी सुनावली.
फिर्यादी मंगेश संजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी साडेचार वाजता बोराळा येथील मंदिराच्या ओट्यावर फिर्यादीचा भाऊ विशाल जाधव वन समितीचे गॅस सिलिंडर वाटप करीत होता. त्यावेळी आरोपी केशव जाधव, विजय जाधव, भगवान जाधव आणि महादेव गवळी यांनी गॅस वाटपाच्या कारणावरून वाद घातला.
फिर्यादीने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता सर्व आरोपींनी त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी केशव जाधव याने हातातील कुर्‍हाडीने फिर्यादीच्या डोक्यात वार करून जखमी केले. फिर्यादीची वहिनी भांडण सोडविण्यास आली असता तिलाही आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. तपास अधिकारी पोहेकॉ. जनार्धन इंगळे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
या खटल्यात सरकारी पक्षाने आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. साक्षी घटनेशी सुसंगत ठरल्याने तसेच सरकारी अभियोक्त्यांच्या प्रखर युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले. न्यायालयाने सर्व आरोपींना भादंवि कलम ३२३ अंतर्गत एक महिना सश्रम कारावास व प्रत्येकी १ हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ७ दिवस सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. तसेच भादंवि कलम ३२४ अंतर्गत सहा महिने सश्रम कारावास व प्रत्येकी २ हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली.या सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्यात, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच दंडाच्या रकमेतून ५ हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही दिला.
या प्रकरणात सरकारी अभियोक्ता छाया बावने व हीतेश रहाटे यांनी फिर्यादी पक्षाची बाजू मांडली. पोहेकॉ. विलास बंगाळे व शेखर थोरात (पो. स्टे. बुलढाणा) यांनी सहकार्य केले.