माजी जिल्हा परिषद सदस्याचे घर भरदिवसा फोडले!; जळगाव जामोद तालुक्यातील घटना

 
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जळगाव जामोद येथील माळी खेल भागातील माजी जिल्हा परिषद सदस्य कैलासराव  गणपतराव बोडखे (६०) यांच्या घरात भरदिवसा चोरी झाल्याचा प्रकार काल, २९ डिसेंबर रोजी समोर आला. या प्रकरणी आज, ३० डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलासराव बोडखे हे काल शेगाव येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले होते. त्यांची लहान सून बाळासह एकटीच घरी होती. दुपारी दोनच्या सुमारास सून पल्लवी घराच्या खालच्या रूमचा दरवाजा बंद करून वरच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली होती. संध्याकाळी पाचला झोपेतून उठल्यानंतर सुनेला घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला व घरातील कपाटसुद्धा उघडे दिसले.

सुनेने सासरे कैलासराव बोडखे यांना फोन करून घरात चोरी झाल्याचा संशय व्यक्त केला. रात्री साडेनऊच्या सुमारास कैलासराव बोडखे घरी परतले असता त्यांना कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ५१ हजार ७००  रुपये दिसले नाहीत. हे पैसे त्यांना बुलडाणा अर्बनमध्ये भरायचे होते. ते त्यांनी जमा करून ठेवले होते. चोरट्यांनी आमच्या घरात प्रवेश करून ५१ हजार ७०० रुपये चोरून नेले, अशी तक्रार बोडखे यांनी आज, ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता  जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामोद चौकीचे नापोकाँ उमेश शेगोकार करीत आहेत.