जळगाव जामोद परिसरात वनविभागाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त...

 
 बुलढाणा (जिमाका/बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जळगाव जामोद-संग्रामपूर मार्गावरील चांगोफळ परिसरात वनविभागाने टाकलेल्या धडक धाडीत लाखो रुपयांचा अवैध लाकूडसाठा जप्त करण्यात आला आहे. विनापरवाना साठवून ठेवलेल्या तब्बल ३६८ नग नीम (कडुलिंब) प्रजातीच्या लाकडांचा साठा वनविभागाने जप्त केला असून, त्याची अंदाजे किंमत ४ लाख ७९ हजार ५०० रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १४ मे २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता तसेच १७ मे रोजी दुपारी १२.३२ वाजता चांगोफळ परिसरातील संशयित ठिकाणी पाहणी करण्यात आली. या वेळी मोठ्या प्रमाणात विनापरवाना आणि अवैधरीत्या साठवून ठेवलेला कडुलिंब लाकडांचा साठा आढळून आला. वनअधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करून संबंधित ठिकाणी वनगुन्हा नोंदवला.
कारवाईदरम्यान खाटूश्याम सॉ मिलच्या बाहेरील एका खासगी जागेत अवैध लाकूडसाठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. यामध्ये सुमारे ५० घनमीटर क्षमतेचा ३६८ नगांचा माल जप्त करण्यात आला. यासोबतच न्यू सातपुडा सॉ मिल आणि जामोद परिसरातील इतर ठिकाणांचीही कसून तपासणी करण्यात आली.
ही कारवाई उपवनसंरक्षक जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश काळे, वनपाल एस. एस. सावळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मोहिमेचे नेतृत्व केले. तसेच मोबाईल स्क्वॉड खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश राऊत यांच्यासह वनरक्षक जी. एस. साकळे, कुशोड, कडवकर, गव्हाणे, साळवे आणि प्रणव हागुणे यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, अवैध वृक्षतोड, वाहतूक आणि साठवणुकीला आळा घालण्यासाठी परिसरातील सर्व सॉ मिल्सची टप्प्याटप्प्याने तपासणी करण्यात येणार असल्याचा इशारा वनविभागाने दिला आहे. शासनाकडून वृक्षलागवडीवर भर दिला जात असताना अवैध वृक्षतोड सहन केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधिक वाढले असून, अवैध वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा वनविभागाने दिला आहे. नागरिकांनीही अशा प्रकारची कोणतीही अवैध बाब आढळल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.