चिखलीत एकाच रात्री पाच घरफोड्या! शाहूनगरसह पंचमुखी महादेव मंदिर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्याचे दागिने व रोकड लंपास, चौघे संशयित सीसीटीव्हीत कैद

 
 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील शहूनगर आणि पंचमुखी महादेव मंदिर परिसरात रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच बंद घरांना लक्ष्य केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये एका घरातून सुमारे ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची माहिती आहे. एकाच रात्री घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी विठ्ठल शेगोकार, इंगळे, अनिल सोनुने, संजय अंभोरे आणि माधव कुंडलिक गायकवाड यांच्या घराचे कडी-कोंडे तोडून घरात प्रवेश केला. सुधाकर काळे यांच्या गोडाऊनलाही चोरट्यांनी लक्ष्य केले. काही घरांमधून नेमका किती ऐवज चोरीला गेला, याची माहिती पोलिसांकडून पडताळली जात आहे.

कपाटाचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

पंचमुखी महादेव मंदिराजवळ राहणारे माधव कुंडलिक गायकवाड (३२) यांच्या घरात १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ ते २.४५ वाजेदरम्यान चोरट्यांनी प्रवेश केला. लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून सोन्याची सात ग्रॅमची मंगळसूत्र पोत, तीन ग्रॅमचे सोन्याचे फूल असा एकूण सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद आहे.

चौघे संशयित सीसीटीव्हीत कैद

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये तोंडाला कपडा बांधलेले चार संशयित दिसून येत आहेत. त्यांच्या हातात हत्यारासारख्या वस्तू असल्याचेही फुटेजमध्ये दिसत असल्याचे वृत्त आहे. तिरमारे यांच्या घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित कैद झाले असून, त्यानंतर तेथून निघून गेल्याचे दिसत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

माधव गायकवाड यांच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घरात घुसून चोरी करणे आणि घरफोडीशी संबंधित कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस तपास करत असून, रात्रीची पोलिस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. एकाच रात्री अनेक घरांना लक्ष्य करण्यात आल्याने चिखली शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिस या घरफोड्यांचा छडा किती लवकर लावतात आणि संशयितांना कधी जेरबंद करतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.