देऊळगाव महीत एकाच रात्री पाच घरफोड्या ! दुकानही फोडले..!; कानातल्या बाळ्या ओरबाडून नेल्या....
Jun 30, 2025, 08:32 IST
देऊळगाव मही (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : देऊळगाव मही शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्रीत पाच घरांमध्ये आणि एका किराणा दुकानात चोरी केल्याची घटना समोर आली आहे. रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि किराणा माल असा एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरट्यांनी शहरातील विविध भागातील घरे आणि दुकानाला लक्ष केले. मथुराबाई मधुकर शिंगणे या त्यांच्या घरात झोपलेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी कानातील सोन्याच्या बाळ्या जबरदस्तीने ओरबाडून नेल्या. या झटापटीत त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. आरडाओरड केल्यानंतर चोरटे पळून गेले.
त्यानंतर शशिकला किसन खिल्लारे यांच्या घरातून झुंबड, शिवणपिशव्या आणि रोख १५ हजार रुपये चोरून नेण्यात आले. मंदा खेत्रै यांच्या किराणा दुकानातून सुमारे १२ हजार रुपयांचा माल आणि ५५०० रुपये रोख रक्कम चोरीस गेली.
पोलिसांनी घटनास्थळांची पाहणी केली असून, तपास सुरू आहे. दरम्यान, या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.