चिखलीत चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील पैसे लुटणारा ‘मुठल्या’ जेरबंद; चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Apr 30, 2025, 15:10 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली शहरात फर्निचर विक्रेत्याला झोपेत असताना चाकूचा धाक दाखवत जबरदस्तीने खिशातील ११ हजार रुपये लुटणाऱ्या भामट्याला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री १२.३० च्या सुमारास खामगाव चौफुली रोडवरील दुकानाजवळ घडली होती.
फर्निचर विक्रेता शेख सलीम शेख हनीफ यांनी चिखली पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, ते दिवसभरातील कामे आटोपून त्यांच्या दुकानातच रात्री झोपले होते. त्यांच्याकडे त्या दिवशी फर्निचर विक्रीचे ११ हजार रुपये पॅंटच्या खिशात होते. मध्यरात्री एक अनोळखी इसम त्यांच्या खिशाला हात घालत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रतिकार केला. मात्र आरोपीने चाकूचा धाक दाखवत 'इथेच भोसकतो' अशी धमकी देत त्यांचे पैसे जबरदस्तीने काढून घेतले व काळ्या रंगाच्या दुचाकीवरून फरार झाला.
तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे विवेक उर्फ मुठल्या ब्राम्हणे (रा. रोहिदास नगर, चिखली) याला आदर्श कॉन्व्हेंट परिसरातून अटक करण्यात आली. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर, विश्वासात घेऊन विचारपूस करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून ८,५६० रुपये रक्कम हस्तगत केली आहे. उर्वरित रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व चाकू यासंदर्भात तपास सुरू आहे.
ही कारवाई ठाणेदार संग्राम पाटील, पोउपनि समाधान वडणे, तसेच गुप्त माहिती पथकातील अंमलदार पो. राजेंद्र काळे, अमोल गवई, अजय इटावा, प्रशांत धंदर, पंढरीनाथ मिसाळ, राजेश मापारी, सागर कोल्हे, निलेश सावळे, राहुल पायघन, माया सोनोने आणि रुपाली उगले यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली. चिखली पोलीस स्टेशनच्या तत्परतेमुळे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीला दणका बसला आहे.