आधी शॉट सर्किट, मग फुटले गॅस सिलिंडर! देऊळगावराजा जवळच्या दगडवाडीत भीषण अग्नितांडव...७ जण भाजले
Apr 13, 2026, 09:49 IST
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील दगडवाडी येथे १० एप्रिलच्या मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे एका घराला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग विझवण्याच्या प्रयत्नांदरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन सात जण भाजून जखमी झाले. मात्र, अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, दगडवाडी येथील कारभारी दिपाजी नागरे यांच्या घराला मध्यरात्री अचानक आग लागली. शेजारील सौंदा उगलमुगले हे बाहेर आल्यावर त्यांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना सतर्क केले व सरपंचांशी संपर्क साधला. यानंतर पत्रकार गजानन घुगे यांनी पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांना घटनेची माहिती देत अग्निशामक दलाची मदत मागवली.
पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेत अग्निशामक दलाला पाचारण केले. अवघ्या १५ ते २० मिनिटांत अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत गावकऱ्यांनी पाण्याच्या बाटल्यांद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. दरम्यान, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच घरातील गॅस सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की घरावरील टिन पत्रे व दगड दूरवर फेकले गेले. मोठा आवाज झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. मदतीसाठी धावलेल्या काही ग्रामस्थांना दुखापत झाली.
या दुर्घटनेत आर्यन शंकर घुगे याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याला १८ टाके पडले, तर सत्यभामा काशीराम उगलमुगले, चंद्रभागा छगन घुगे, गजानन बाजीराव घुगे, शारदा शिवाजी घुगे, शांताबाई कारभारी घुगे व रंजना संतोष डोईफोडे हे जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी हलविण्यात आले.
घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दलाने तत्परतेने कारवाई करत आग पूर्णपणे आटोक्यात आणली. परिसरात इतर घरे लागून असल्याने आग वाढली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. मात्र, वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
या आगीत घरातील धान्य, महत्त्वाची कागदपत्रे, घरगुती साहित्य तसेच छपराचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने आग लागली तेव्हा घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. या वेळी ठाणेदार ब्रह्मगिरी, अग्निशामक दलाचे चालक मापारी, तसेच स्थानिक ग्रामस्थ व सौंदा उगलमुगले यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.