आधी फेसबुकवर मैत्री, नंतर लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये नेले; स्टाफ नर्सवर अत्याचार, शेगावातील तरुणाला अटक !
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असलेल्या महिलेची आरोपीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने कौटुंबिक अडचणी सांगून तिची सहानुभूती मिळवली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपीने आजोबांच्या आजारपणाचे कारण सांगून महिलेला शेगाव येथे बोलावले. त्यानंतर शांततेत बोलण्याच्या बहाण्याने तिला खामगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये नेण्यात आले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितल्यास तसेच शेगावला येण्यास नकार दिल्यास सदर प्रकार तिच्या पतीला सांगून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी सुरुवातीला १० सप्टेंबर २०२६ रोजी अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटनास्थळ शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने पुढील तपासासाठी गुन्हा शेगाव ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे यांनी अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण लिंगाडे करीत आहेत.दरम्यान, महिलेने केलेल्या आरोपांची सत्यता तपासादरम्यान स्पष्ट होणार असून, पोलिसांकडून या प्रकरणातील विविध बाबींचा तपास सुरू आहे.