भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेसह भाजप पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल! हर्षवर्धन सपकाळांचा  जाळला होता पुतळा...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरातील जयस्तंभ चौक येथे प्रतीकात्मक पुतळा जाळून आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता जमाव जमवून घोषणाबाजी करत पुतळा दहन करण्यात आल्याने कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात महाशिवरात्रीसह इतर पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे १४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान जमावबंदी लागू असून मुंबई पोलीस कायद्यांतर्गत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन झाल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

या प्रकरणी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, जिल्हा सचिव चंद्रकांत बर्दे, महामंत्री दत्ता पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार सचिन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेस व भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष या घटनेनंतर अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.