आईच्या निधनानंतर पोटच्या मुलीवरच बापाची वाईट नजर! संतापजनक कृत्य करणाऱ्या नराधम पित्याला ३ वर्षांचा कारावास!

 चिखली न्यायालयाचा दणका; २ हजार ५०० रुपयांचा दंड, पीडित मुलीला नुकसानभरपाई देण्याचेही आदेश...

 
 चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ज्या बापाने आपल्या मुलीचे रक्षण करायला हवे, त्याच बापाने तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा संतापजनक प्रकार चिखलीत समोर आला होता. आईचे छत्र हरपल्यानंतर पोटच्या मुलीला आधार देण्याऐवजी तिचा छळ करणाऱ्या या पित्याला अखेर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चिखली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी पित्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश रवीकुमार केशरमल शर्मा यांनी हा निकाल दिला.

आई गेली, पण बापाकडूनच मुलीच्या विश्वासाला तडा!

खामगाव चौफुली परिसरातील चिखली येथे राहणाऱ्या या मुलीच्या आईचे २०१८ मध्ये निधन झाले होते. आईच्या मृत्यूनंतर मुलीच्या आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीचा आधार बनण्याऐवजी आरोपी पित्याने तिच्या असहाय परिस्थितीचा गैरफायदा घेतल्याचे तपासात समोर आले.आरोपी दारूच्या नशेत घरी येऊन मुलीचा विनयभंग करत असल्याचा आरोप होता. वडिलांच्या भीतीपोटी पीडिता बराच काळ गप्प राहत होती. ज्या घरात मुलीला सुरक्षित वाटायला हवे, त्याच घरात तिला छळाचा सामना करावा लागल्याचे या प्रकरणातून समोर आले.

१४ नोव्हेंबरला संतापजनक प्रकार; मुलीच्या आरडाओरड्याने शेजारी धावले!

१४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता आरोपी दारूच्या नशेत घरी आला. यावेळी त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि तिची सुटका झाली.
या घटनेनंतर पीडितेने चिखली पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास सुरू केला.

BNS आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा; चार साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची

चिखली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले.सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी बाजू मांडली. या प्रकरणात चार महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

तीन वर्षांचा कारावास; पीडितेला नुकसानभरपाईचे आदेश

न्यायालयाने आरोपी पित्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून २ हजार रुपये पीडित मुलीला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय पीडितेला अतिरिक्त आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रकरण विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्याकडे वर्ग करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

तपास अधिकाऱ्यांसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे सहकार्य

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चव्हाण यांनी केला. न्यायालयीन कामकाजात नंदाराम इंगळे आणि रमेश्वर भांडकर यांनी सहकार्य केले.आईचे छत्र हरपलेल्या मुलीला स्वतःच्या बापाकडूनच छळ सहन करावा लागल्याची ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी आहे. मुलांचे संरक्षण आणि सुरक्षितता ही सर्वांत आधी कुटुंबाची जबाबदारी असते. मात्र, रक्षणकर्त्यानेच विश्वासाला तडा दिल्याच्या अशा प्रकरणांत कायद्याची कारवाई आणि पीडितेला योग्य मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. चिखली न्यायालयाच्या या निकालाने पीडितेला न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.